होय, अतिरेक्यांना आम्हीच पोसले!   

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची जाहीर कबुली 

इस्लाामाबाद : पाकिस्तान गेल्या तीन दशकांपासून अतिरेक्यांना पोसत असून त्यांना पाठिंबा आणि प्रशिक्षण देत आहे. अमेरिका आणि पाश्चात्य देशांसाठी दहशतवाद पोसण्याचे घाणेरडे कृत्य करावे लागले, अशी जाहीर कबुली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली.   
 
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे का? असा प्रश्न एका मुलाखतीत ख्वाजा असिफ यांना विचारला गेला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा आणि आर्थिक साहाय्य दिले आहे. जागतिक शक्तींनी त्यांच्या हितासाठी पाकिस्तानचा वापर रशिया आणि भारताविरोधात केला. लादेन प्रकरणी अमेरिकेविरोधात पाकिस्तानचा वापर झाला. दहशतवाद्यांना पोसणे, पाठिंबा आणि प्रशिक्षण देणे ही आमची केवळ चूक नव्हे, घोडचूक होती! त्याची शिक्षा आता पाकिस्तानला भोगावी लागत आहे.  अफगणिस्तानात सोव्हिएत युनियनविरुद्धच्या विरोधातील युद्धात पाकिस्तान सामील झाला नसता आणि ओसामा बिन लादेनला आम्ही सहकार्य केले नसते तर चित्र वेगळे दिसले असते, असे सांगताना ते म्हणाले, ९/११ च्या हल्ल्यानंतरच्या बिकट परिस्थितीला देशाला सामोरे जावे लागले नसते, पाकिस्तान  निष्कलंक राहिला असता! अमेरिका, ब्रिटन आणि पाश्चात्य देशांच्या नादाला लागून आम्ही दहशतवाद पसरविला. त्याचे दूरगामी परिणाम देशाला भोगावे लागत असल्याची खंत आसिफ यांनी व्यक्त केली. गेली तीन दशके पाश्चात्य देशांसाठी दहशतवाद पोसण्याचे घाणेरडे कृत्य केले. आता तेच देश पाकिस्तानला दुषणे देत आहेत. दहशतवादी राष्ट्र म्हणून जागतिक पातळीवर आमची निंदा करत आहेत.
ख्वाजा आसिफ म्हणाले, पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाचे अस्तित्व नाही. भूतकाळात या दहशतवादी संघटनेचे पाकिस्तानशी संबंध होते. मात्र, आता ही संघटना पाकिस्तानात नाही. पहलगाम हल्ल्यानंतर  भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे.  वाद असाच सुरू राहिला तर त्याचे रुपांतर मोठ्या युद्धात होऊ शकेल. 
 
भारताने कारवाई केली तर पाकिस्तान प्रत्युत्तर देईल. काही गोष्टी चुकीच्या झाल्या तर या संघर्षाचे परिणाम धोकादायक ठरु शकतात. जर भारताने कोणतीही कारवाई केली तर पाकिस्तानकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे असल्याने आता जगाने काळजी करावी. तथापि, दोन्ही देश चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
 

Related Articles